मी मानसकन्या
मी मानसकन्या आजकाल आई-वडील व मुले अशा विभक्त कुटुंबपद्धतीत जरा वेगळं वाटेल, असं नातं जपलेल्या, 'आई'इतक्याच प्रेमानं वागणाय्रा, फलटणला आमच्या शेजारी राहणाय्रा, पद्मावती कळसूर काकूंची मी जणू मानसकन्याच. आधी त्याही शासकीय कर्मचाय्रांच्या वसाहतीत आमच्या शेजारीच राहायच्या. पण नंतर त्यांनी शासकीय कार्यालयापलिकडे स्वतंत्र बंगला बाधून तेथे ते कुटुंब राहायला गेलं. पण ते अंतरही माझ्यासाठी अन् माझ्या धाकट्या भावासाठी फार नव्हतं. कारण आई रागावली की मी पिशवीत माझे कपडे भरून कळसूर काकूंकडे राहायला जायची. कळसूर काकूंचं व्यक्तिमत्व अगदी सोज्वळ आणि वागाय-बोलायला खूप सालस. कायम नऊवारी साडी नेसायच्या. केसांचा अबाडा अन् त्यावर दारातल्या फुलांचा छानसा गजरा माळलेला. माळजाई देवीच्या मंदिरात जवळजवळ रोज किर्तन ऐकण्यासाठी त्या मला घेऊन जायच्या. त्यांच्या सगळ्या वस्तू जणू माझ्यासाठीच असत. मी पाच-सहा वर्षांची असेन, पण मला त्या त्यांच्यासाठी आणलेली नवीन नऊवारी साडी घडी मोडायला देत. नवीन साडीचा पिळा देवासमोर ठेवून त्याला हळद-कुंकू वाहून मग मी ती नेसायची. थोडं मिरवून येवून, पुन्हा फ्रॉकमध्ये हळदी-कुंकू स...